१० वी-१२ वीच्या परीक्षेवर सीसीटीव्हीची 'वॉच' गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य व विभागीय मंडळाची कडक पावले
सिंधुदुर्गनगरी
फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य व विभागीय मंडळाने अत्यंत कडक पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर, परीक्षेच्या शिस्तीबाबत विभागीय मंडळाने सर्व परीक्षा केंद्र शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य आणि केंद्रसंचालकांसाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या परीक्षेदरम्यान कॉपी आणि इतर गैरप्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणेचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. सर्व परीक्षा केंद्रांवरील हालचालींवर कॅमेऱ्यांची करडी नजर राहणार असून, या रेकॉर्डिंगचे जतन करण्याबाबत मंडळाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. परीक्षेच्या काळातील प्रत्येक तासाचे चित्रीकरण सुरक्षित ठेवणे ही केंद्रसंचालकांची जबाबदारी असेल. जर कोणत्याही केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणेत त्रुटी आढळली किंवा निर्देशांचे पालन झाले नाही, तर संबंधित जबाबदार व्यक्तींवर थेट प्रशासकीय कारवाई करण्याचा इशारा मंडळाने दिला आहे. या निर्णयामुळे परीक्षा केंद्रांवरील शिस्त अधिक कडक होणार असून, प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे.

konkansamwad 
