'शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा' अंतर्गत बाह्य मूल्यमापनात आंबडपाल शाळा राज्यात अव्वल
कुडाळ
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या 'शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा' अंतर्गत बाह्य मूल्यमापनात कुडाळ तालुक्यातील आंबडपाल जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेने उत्कृष्ट कामगिरी बजावत राज्यस्तरावर 'अ' श्रेणी प्राप्त केली आहे. या घवघवीत यशामुळे संपूर्ण जिल्ह्यातून या शाळेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शासनाच्या वतीने शाळांचा शैक्षणिक दर्जा, उपलब्ध भौतिक सुविधा आणि सर्वांगीण गुणवत्ता तपासण्यासाठी हे विशेष मूल्यमापन करण्यात आले होते. यामध्ये आंबडपाल शाळेने राबविलेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थ्यांची प्रगती आणि शाळा व्यवस्थापन समितीचा सक्रिय सहभाग या जोरावर हे मानांकन मिळविले. राज्यातील मोजक्याच शाळांना हा बहुमान मिळाला असून, त्यात आंबडपाल शाळेने आपले स्थान निश्चित केले असल्याची माहिती संजय बगळे यांनी दिली. या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आणि पालकांना देण्यात आले आहे. शाळेने केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर अवांतर उपक्रमांतही आपली मोहोर उमटविली आहे. विशेषतः शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांनी कष्टाने फुलविलेली 'केळीची बाग' हे श्रमसंस्काराचे उत्तम उदाहरण ठरत आहे. 'स्वच्छ शाळा, सुंदर शाळा' आणि 'गुणवत्तापूर्ण शाळा' हे ब्रीदवाक्य केवळ भिंतीवर न राहता ती या शाळेची खरी ओळख बनली आहे.मूल्यमापनाच्या प्रक्रियेत शाळेचे भौतिक वातावरण, मुलांची शैक्षणिक प्रगती आणि शाळा व्यवस्थापनाचा सहभाग या सर्व निकषांवर शाळा सरस ठरल्याचे बगळे यांनी सांगितले. या यशाबद्दल परिसरातील शिक्षणप्रेमी ग्रामस्थांनी शाळेचे अभिनंदन केले असून, भविष्यातही ही गुणवत्ता अशीच टिकवून ठेवण्याचा विश्वास शाळा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

konkansamwad 
